निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात प्रकृतीचे विविधांगी आणि मनोहारी रुप अनुभयास मिळते. इतिहासाची दीर्घ परंपरा, संत-महात्म्यांचा या भूमीला झालेला पदस्पर्श, तीर्थस्थळे, सहकाराचा विस्तार, दूध प्रक्रीया उद्योग, साखर उत्पादनाचे केंद्र आणि ग्रामविकासाचा आदर्श असलेली हिवरेबाजार आणि राळेगणसिद्धी सारखी गावे ही जिल्ह्याची मुख्य ओळख आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असल्याने जिल्ह्याला अहिल्यानगर अशी नवी ओळख मिळाली आहे.
जिल्ह्याच्या पूर्वेस बीड, आग्नेय दिशेस उस्मानाबाद व सोलापूर, दक्षिणेस आणि नैर्ऋत्येस पुणे, पश्चिमेस आणि वायव्य दिशेला ठाणे व नासिक, उत्तरेला नासिक आणि ईशान्येस औरंगाबाद हे जिल्हे आहेत. जिल्ह्यात कोपरगाव, राहता, अकोला, संगमनेर, श्रीरामपूर, राहूरी, नेवासे, शेगाव, पारनेर, अहिल्यानगर, पाथर्डी, श्रीगोंदे, कर्जत आणि जामखेड असे चौदा तालुके आहेत. सह्याद्री आणि त्याच्या उपशाखा कळसूबाई, बालेश्वर व हरिश्चंद्रगड ह्यांनी जिल्ह्याचा पश्चिम भाग व्यापलेला आहे. अकोले आणि संगमनेर तालुक्यांच्या उत्तर सीमेवर कळसूबाईची रांग आहे. कळसूबाईच्या दक्षिणेस हरिश्चंद्रगडाची पूर्व-पश्चिम रांग पसरलेली आहे.
जिल्ह्यातील अभयारण्यातून समृद्ध वनजीवनाचे दर्शन होते. कर्जत तालुक्यातील देऊळगाव, रेहेकुरी अभयारण्य काळविटांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. गोदावारी, भीमा आणि प्रवरा नदीच्या खोऱ्यामुळे इथे कृषी विकासाला चालना मिळाली आहे. गोदावरी प्रथम कोपरगाव तालुक्यामधून आणि नंतर श्रीरामपूर, नेवासे व शेवगाव तालुक्यांच्या उत्तर सीमांवरून वाहते. प्रवरा ही गोदावरीची महत्त्वाची उपनदी अकोला तालुक्यात उगम पावते व नेवासे तालुक्यातील प्रवरासंगम येथे गोदावरीस मिळते. या नदीवर भंडारदरा येथे धरण बांधले आहे. हे पर्यटकांच्या आवडीचे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या सीना आणि घोडा या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. कुकडी नदी पारनेरमधून वाहते. या नद्यांच्या तीरावर इथली संस्कृती विकसीत झाली आहे. नद्यांच्या काठावर असलेली तीर्थस्थळे, देवालये, घाट, यात्रा-उत्सव आपल्या संस्कृतीची ओळख करून देतात.
अहिल्यानगर जिल्हा ‘सहकार पंढरी’ म्हणून ओळखला जातो. सहकार चळवळ इथे चांगलीच रुजली आणि सहकाराच्या माध्यमातून साखर कारखाने उभे राहिले. राज्याच्या एकूण साखरेच्या उत्पादनामध्ये एकट्या अहिल्यानगर जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना सन १९५० साली राहता तालुक्यातील प्रवरानगर उभा राहिला आणि साखर उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज जिल्ह्यात एकूण २२ साखर कारखाने आहेत.
साखर कारखानदारीमुळे ग्रामीण भागात आमुलाग्र बदल झाला आहे. साखर कारखान्याद्वारे साखरेसोबत ईथेनॉल, सहवीज निर्माती, सॅनिटायझर, मळी, बगॅस, मद्यार्क निर्माती आदी उत्पादने घेण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील सिंचन सुविधांच्या विकासामुळे कृषी विकासालाही चालना मिळाली आहे. द्राक्षे, डाळींब, पेरू यासारख्या फळांच्या उत्पादनासोबत कडधान्ये आणि भाजीपाला उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते. शेतकरी आता आधुनिक शेती पद्धतीकडे वळू लागले आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी संशेाधनालाही चालना देण्यात मिळाली आहे.
जिल्ह्यात उच्च् शिक्षणाच्या उत्तम सुविधांचा विकास आणि विस्तार होत आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासोबत इतरही आधुनिक प्रकारच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण इथे उपलब्ध आहे. प्राथमिक शिक्षण दर्जेदार होण्यासाठी ‘डिजीटल शाळा’ उपक्रमावर भर देण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्हा दुग्ध व्यवसायात अग्रेसर असून जिल्ह्यात सर्वात जास्त पशुपालक आहे. साधारणतः २ लाखावर दुध उत्पादक शेतकऱ्यां सरासरी ४६ लाख प्रतिदिन लिटर इतके दुधाचे उत्पादन होते. दुध उत्पादक शेतकरी संकरीत पशु यांचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन करीत असल्याने जिल्ह्यातील संकलित होणारे १२ ते १८ लाख इतक्या उत्कृष्ट गुणप्रतीच्या दुधाचा परराज्यातील अमुल, सुमूल, पंचमहल इ. उद्योग समूहांना पुरवठा होतो.
अहमदनगर औद्योगिक क्षेत्राची स्थापना सन १९७२ मध्ये करण्यात आली. सुपा पारनेर औद्योगिक क्षेत्र सन १९९६ मध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रामध्ये १८० हेक्टर क्षेत्र हे प्रामुख्याने ‘जापनीज पार्क’ म्हणून विकसित केलेले आहे. सुपा पारनेर औद्योगिक उद्यानासाठी ९३४ हेक्टर क्षेत्र अधिसूचीत झाले आहे. तिन्ही औद्योगिक क्षेत्र मिळून ३ हजार २०० हून अधिक भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. पाणी, वीज, रस्ते, पथदिवे आदी सुविधा असल्याने या औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार होत आहे. पुणे आणि शिर्डी विमानतळ साधारण १०० किलोमीटरच्या परिसरात असल्याने, तसेच रेल्वे मार्ग आणि राज्य व राष्ट्रीय महामार्गाने जोडले गेल्याने उद्योगांसाठी सोईचे झाले आहे. जिल्ह्यात केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत ५ औद्योगिक विकास समूह स्थापन झाले आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याचा २०२३-२४ मध्ये प्रथम क्रमांक आला आहे.
अहिल्यानगर जिल्हा हा पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखला जाणाऱ्या भागात मोडत होता असे म्हणतात म्हणून पूर्वीच्या काळी घडलेल्या बऱ्याच घटनांचा या भूमीशी संबंध जोडला जातो. जटायूकथा ही या भागातील पट्टा किल्ल्यावर घडल्याचे सांगतात. श्री अगस्तीची यात्रा आजही अकोल्याशेजारील आगर येथे महाशिवरात्रीस भरते. पाथर्डी तालुक्यात पांडवकालीन अवशेष दाखवितात. शालिवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) जिल्ह्याला लागूनच असल्यामुळे जिल्ह्यात तत्कालीन अवशेष सापडतात. नेवासे उत्खननातील अवशेष त्यांपैकीच आहेत. संगीत, नृत्य, लोककला, नाट्य, शिल्प, स्थापत्य आणि साहित्यकलेची समृद्धीदेखील जिल्ह्यात पाहावायास मिळते. धार्मिकस्थळी होणाऱ्या विविध यात्रांमधून लोकसंस्कृतीचे दर्शन घडते.
अहिल्यानगरची भूमी संत-सत्पुरुषांची भूमी आहे, ऐतिहासिक भूमी आहे. इथे अनेक संतांनी आपल्या विचारांनी समाजाचे प्रबोधन केले, त्यांना जीवनमार्ग दाखविला. आजही अशा संत-महात्म्यांची थोरवी इथे गायली जाते. त्यांच्या दर्शनासाठी देशविदेशातून श्रद्धाळू इथे येत असतात. मराठी भाषेच्या प्रांतात आणि समाजजागरणात क्रांती घडविणाऱ्या ज्ञानेश्वरी ग्रंथांचे लेखन याच भूमीतले. नेवासे येथे मोहिनीराजांचे प्राचीन मंदिर आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना येथेच पैस खांबाजवळ बसून केली. नाथसंप्रदायी कानिफनाथांची समाधी मढी येथे आहे. संत साईबाबांची शिर्डीला समाधी असल्यामुळे ते तीर्थक्षेत्र बनले आहे. शेख महंमद महाराज, निळोबाराय, संत गोदड महाराज आदी संतांनी सामाजिक आणि सांस्कृतिक जागृतीचे कार्य केले.
जिल्ह्यात जन्मलेल्या काही महान व्यक्तिमत्वांच्या कार्यकर्तुत्वाची दखल इतिहासाने घेतली. पुण्श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म चौंडी या गावात झाला. त्यांच्याच नावाने जिल्ह्याला नवी ओळख मिळाली आहे. पुणतांबे शालिवाहनकाळापासूनच प्रसिद्ध आहे. पंधराव्या शतकात अहमदनगरला स्थापन झालेल्या निजामशाहीचा इतिहास सांगणाऱ्या नगरचा किल्ला, चांदबिबीचा महाल, मलिक-इ-मैदान तोफ इ. कित्येक वास्तू आजही व्यवस्थित आहेत. पेशवाईत गाजलेला विठ्ठल सुंदर (साडेतीन शहाण्यांपैकी एक) संगमनेरचा, तर त्रिंबकजी डेंगळे निमगाव जाळी येथील होते. अहमदनगर किल्ल्यात स्वातंत्र्य संग्रामातील अनेक नेत्यांना बंदीस्त करून ठेवण्यात आले होते. रोमांचित करणाऱ्या स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी या भूमीशी जोडलेल्या आहेत.
इंग्रजांनी अहिल्यानगरचा ताबा घेतल्यानंतर कोळी आणि भिल्ल यांनी एकत्रित ब्रिटिश सैन्याला त्रास दिला. वीर राघोजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली हे बंड होते. शेवटी १८४७ साली पंढरपूरला ते पकडले गेले आणि लगेच त्याला फाशी देण्यात आली. १८५७ च्या महान स्वातंत्र्य संग्रामात अहिल्यानगर हे प्रचंड अशांततेचे एक ठिकाण होते. भाजीजी भागोजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १७०० भिल्ल सक्रिय स्वातंत्र्यसैनिक होते.
‘चले जाव’ आदोलनादरम्यान महात्मा गांधी, सरदार पटेल , राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, सुभाष चंद्र बोस, डॉ. सय्यद महमूद, शंकरराव देव यांना अटक करण्यात आली. गांधी वगळता बहुसंख्य नेत्यांना अहमदनगर किल्ल्यात ठेवले होते. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे प्रसिद्ध पुस्तक ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ याच किल्ल्यात लिहिले.
अष्टविनायकांपैकी एक सिद्धटेकला आहे. राशिन येथील देवी व दीपमाळ प्रसिद्ध आहे. शिंगणापूरला शनीचे जाज्वल देवस्थान असून त्याच्या प्रतापामुळे गावात चोरी होत नाही, या श्रद्धेमुळे तेथील दारांना कड्याकुलपे नाहीत. अहिल्यानगरजवळचा डोंगरगण, भंडारदरा, रंधा धबधबा व साखर कारखाने ही जिल्ह्यातील आधुनिक प्रेक्षणीय स्थळे आहेत. पाथर्डीचे मोहटादेवीचे मंदिर, अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी असलेले चौंडी, गोरक्षनाथ गड, रेहकुरी अभयारण्य, निघोजचे रांजणखळगे, निसर्गसुंदर भंडारदरा, पैसं खांब, पाथर्डी येथील भगवानबाबा गड अशी अनेक ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात.
इथे निसर्गाचा अद्भूत सहवास आहे, उंच शिखरांचे आवाहन आहे, भाव-भक्तीचा मनोहारी संगम आहे, देदीप्यमान इतिहासाची प्रेरणा आहे, समाज जीवनातील प्रवाहिता आणि विविधता आहे, उद्यमशीलता आहे, देवालयातील शांतता आणि पावित्र्य आहे. इतिहासाचे क्षण, आपला वैभवशाली वारसा, संतांचा उपदेश जोपासत अहिल्यानगर जिल्हा आता विकासाच्या वाटेवर पुढे जात आहे.